शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली: राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:45 PM2020-01-22T16:45:53+5:302020-01-22T16:46:16+5:30
ही योजना यशस्वी होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे.
मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन’ योजेनेचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी ही योजना फसवी असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. भाजपच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आले आहे.
शिवभोजन योजनेचा लाभ हा गरिबांना होणार आहे. ही योजना यशस्वी होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे. मात्र असे असताना विरोधक आधीच ही योजना फसवी असल्याच्या भविष्यवाणी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी केला आहे. तर शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली आहेत, असा टोलाही आमदार टकले यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार राम कदम यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.