हिंगणघाट जळीतकांड : भाजप नेत्यांच्या निषेध मोर्च्यातील हसऱ्या मुद्रेवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 01:06 PM2020-02-13T13:06:01+5:302020-02-13T13:06:20+5:30
महाराष्ट्राच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून सरकार प्रयत्नशील असताना, अशा फसव्या आंदोलनातून भाजपाचा ढोंगीपणाच समोर आला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.
मुंबई : हिंगणघाट घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी काढलेल्या निषेध मोर्च्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. तर या मोर्चाचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत, नौटंकी-ढोंगीपणा हाच भाजपाचा खरा चेहरा असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
हिंगणघाट येथील जळीतकांडाचा बळी ठरलेल्या महाराष्ट्राच्या लेकीबाबत भाजपा किती असंवेदनशील आहे, हेच त्यांच्या एका आंदोलनावरून उघड झालेय. हिंगणघाट घटनेचा निषेध करून सरकारकडे बोट दाखवण्यासाठी निषेध मोर्चा काढण्याचे नाटक भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले. या मोर्चात सामील झालेले भाजपाचे पदाधिकारी आणि खुद्द माजी आमदार मात्र हसत हसत फोटो काढून घेण्यात व्यस्त होते, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथील जळीतकांडाचा बळी ठरलेल्या महाराष्ट्राच्या लेकीबाबत भाजपा किती असंवेदनशील आहे, हे भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या आंदोलनात दिसले. मोर्चात सामील झालेले भाजपाचे पदाधिकारी आणि खुद्द माजी आमदार पीडितेला श्रद्धांजली वाहताना हसत हसत फोटो काढून घेण्यात व्यस्त दिसले. pic.twitter.com/WOjzbNLHkn
— NCP (@NCPspeaks) February 12, 2020
यावरून हिंगणघाट येथील घटनेचे भाजपाला खरंच किती गांभीर्य आहे हे स्पष्ट झालंय. महाराष्ट्राच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून सरकार प्रयत्नशील असताना, अशा फसव्या आंदोलनातून भाजपाचा ढोंगीपणाच समोर आला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.