'अब की बार 72 घोटाळेबाज फरार'; राष्ट्रवादीची केंद्रसरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 02:37 PM2020-02-08T14:37:04+5:302020-02-08T14:43:41+5:30
२०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे.
मुंबई : विजय माल्ल्या, नीरव मोदी सारखे अनेक उद्योगपती बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्याच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. यावरून राष्ट्रवादीने केंद्रसरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकारच्या राजवटीत आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून गेलेल्या भारतीय उद्योजकांची यादी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण, २०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चोकसी, ललित मोदी यांच्यासारखे तब्बल ७२ उद्योजक मोदी सरकारच्या कृपेमुळे मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाण्यात यशस्वी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
तर, हे आरोपी देशात वास्तव्यास आहेत की नाही याचा तपास सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.