“ट्रम्प येता दारी, गरीबांची चिंता कोण करी”; राष्ट्रवादीकडून मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 04:02 PM2020-02-19T16:02:02+5:302020-02-19T16:02:11+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय दौऱ्यासाठी गुजरातमध्ये येणार म्हणून मोदी सरकार श्रीमंतीचं सोंग आणतंय.
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला भेट देणार असून या पार्श्वभूमीवर याठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. "ट्रम्प येता दारी, गरीबांची चिंता कोण करी",असा खोचक टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय दौऱ्यासाठी गुजरातमध्ये येणार म्हणून मोदी सरकार श्रीमंतीचं सोंग आणतंय. अहमदाबाद इथे मोटार स्टेडियम मध्ये ट्रम्प आणि मोदी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे. या मैदानाजवळच बऱ्याच वर्षांपासून २०० गरीब कुटुंबं झोपडीत राहतात. मोदींच्या गुजरातचे दारिद्र्य जगासमोर येऊ नये म्हणून येथील महापालिकेने ४५ कुटुंबाना त्यांची राहती घरे, झोपड्या सात दिवसांच्या आत सोडण्याचे फर्मान काढला होता.
तर अशा नोटीसा बजावल्यामुळे गरीब कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अचानक राहती घरं सोडून जायचं कुठे, असा पेच त्यांच्यासमोर उभा आहे. ट्रम्प यांचा रोड शो होणार असल्याने रस्त्यालगतच्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत उभारण्याचे कामही झालेय. या सर्व दिखावेबाजीसाठी तब्बल १०० कोटींची उधळपट्टी करण्यात येणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.
परदेशातील महत्त्वाचे नेते येत असताना शहरांचे सुशोभीकरण करणे, देशाची प्रतिमा मिलीन न होऊ देणे गैर नाही. परंतु, वरून गरीबांचे कैवारी असल्याचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात गरीब कुटुंबांना बेघर करायचं असा दुटप्पीपणा मोदी सरकार करत असल्याची टीकाही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.