फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 07:21 PM2020-10-06T19:21:52+5:302020-10-06T19:23:08+5:30
महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला, असा आरोपही तपासे यांनी यावेळी केला. (NCP)
मुंबई - अभिनेता सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्विटरवर ८० हजार फेक अकाऊंट उघडण्यात आली. यातून सरकार, मुंबई पोलीस आणि मंत्र्यांची बदनामी करण्यात आली. एवढेच नाही, तर बिहारच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने ही अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या नामवंत मंडळींनी तयार केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
या शिवाय, फेसबुक आणि ट्विटरने, या फेक अकाऊंट्सचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अॅड्रेसवरून तयार करण्यात आली, याची माहिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला, असा आरोपही तपासे यांनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशिगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, असेही महेश तपासे यांनी सांगितले. याच वेळी, एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असताना कोणतेही मेडिया ट्रायल होवू नये, असा कायदा केंद्राने भविष्यात करावा, अशीही मागणीही तपासे यांनी यावेळी केली.