Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:14 PM2022-07-23T13:14:01+5:302022-07-23T13:15:17+5:30
Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा मागितली होती, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली नसल्यावरून बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे.
नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवायला नकार दिला होता, असा गंभीर आरोप शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी फोन करून तुम्ही असे आदेश देऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांना कोणतीही सुरक्षा देऊ नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याचा मोठा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती
दिलीप वळसे-पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदारांचे आरोप फेटाळू लावले आणि यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना, पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा अनावश्यक चर्चा आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात. पोलीस विभाग त्याचे विश्लेषण करुन त्याच्यावर काय कारवाई करायची हे ठरवत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.