Kasba Bypoll Election 2023: “प्रचाराला जाणार; चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल”: एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:52 PM2023-02-05T15:52:32+5:302023-02-05T15:54:21+5:30
Kasba Bypoll Election 2023: त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही, अशी टीका करत पोटनिवडणुकीच्या प्रचाराला स्वतः जाणार असल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले.
Kasba Bypoll Election 2023: आताच्या घडीला संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हायला हवी आहे. मात्र, महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. यातच भाजपसोबत कसबा मतदारसंघात काँग्रेसही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असून, चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजापचा पराभव होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.
मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच २०१६ रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षड्यंत्र रचले गेले, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही विरोधकांशी संपर्क करत असून, पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत आहेत. या संदर्भात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. आयकर विभागाने दोन वेळा चौकशी केली, त्यात काही आढळले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. काहीतरी शोधून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यता एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"