“होय, दिल्लीत गेलो होतो, नरेंद्र मोदी अन् अमित शाहांशी...”; नाथाभाऊ भाजपात परतणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:34 IST2024-04-03T13:33:36+5:302024-04-03T13:34:18+5:30
Eknath Khadse News: एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“होय, दिल्लीत गेलो होतो, नरेंद्र मोदी अन् अमित शाहांशी...”; नाथाभाऊ भाजपात परतणार?
Eknath Khadse News: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. काँग्रेससह अन्य पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी भाजपासह महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात परतणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, होय. मी दिल्लीला गेलो होतो. पण माझ्या काही कामासाठी गेलो होतो. मीडियामध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यात तथ्य नाही. तशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो विचार करून घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांशी, पक्षाशी, नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो. असा निर्णय घ्यायचा त्यावेळी आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देईन, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले. सध्यातरी भाजपात परतण्याच्या हालचाली सुरू नसल्याचे खडसेंनी सांगितले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी चांगले संबंध
दिल्लीमध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. असे असले तरी या दिल्लीवारीत अशा कोणत्याही भेटी झाल्या नाहीत. भाजपामध्ये परतण्यासाठी कोणाच्या मार्फत प्रयत्न करण्याची गरज नाही. भाजपामध्ये यायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, यांच्याशी माझे उत्तम संबंध राहिले आहेत. आताही चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपमध्ये यायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असे खडसेंनी सांगितले.
दरम्यान, प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. महाविकास आघाडीचा रावेर मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर होईल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. उन्मेष पाटील यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाबाबत बोलताना, त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी खासदार म्हणून चांगले काम केले असताना तिकीट कापले गेल्याने ते नाराज होते, असे खडसे म्हणाले.