Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निकालापूर्वीच जळगावात जल्लोष; नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे मुक्ताईनगरात लागले फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 08:04 PM2022-06-20T20:04:59+5:302022-06-20T20:05:52+5:30
Vidhan Parishad Election 2022: एकनाथ खडसे यांच्या विजयाची खात्री असल्याने कार्यकर्त्यांकडून मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2022) प्रक्रिया सुरू आहे. सर्वच्या सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर घेतलेले आक्षेप फेटाळल्यानंतर सुमारे दोन तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडे जळगावकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक खडसे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. खडसे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात ते विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलक लागले आहेत.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून, यासाठी मतदान झाले आहे. काही वेळातच निकाल लागणार आहे. तथापि, याआधीच मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावरून खडसे यांचा विजय निश्चित आहे याची खात्री असल्याचेच हे फलक सांगत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.
विधानभवन परिसरात खडसे समर्थकांनी केली गर्दी
एकनाथ खडसे यांचे समर्थक हे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. या समर्थकांना एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे. विधानभवन परिसरात खडसे समर्थकांकडून घोषणाबाजीही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार रामराजे निंबाळकर यांना पहिल्या पसंतीची मते मिळणार असून, एकनाथ खडसे यांना त्यांच्यानंतर मते मिळणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.