“देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा”: एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:28 PM2023-11-21T17:28:07+5:302023-11-21T17:28:34+5:30
Eknath Khadse On Maratha Reservation Issue: सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
Eknath Khadse On Maratha Reservation Issue:मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील सरकारला सातत्याने २४ डिसेंबरची आठवण करून देत आहेत. तर, दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोधही वाढताना पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा, असे म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मागील काळात केले होते, त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी आपला शब्द पाळावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे. यावेळी संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनीही यातून मार्ग काढावा. आपला शब्द पाळावा, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे योग्य नाही
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागितली होती. त्यांनतर पुन्हा मुदत वाढून घेतली. यामुळे साहजिकच आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा समाज्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे. मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे आणि खेळवत राहणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, असे सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कॅसिनोतील व्हायरल फोटोबाबत एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांचे कॅसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी वायरल केला आहे. अजून काही व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे असलेली क्लीप समोर अणावी, म्हणजे खरे काय ते जनतेसमोर येईल. मात्र महाराष्ट्र संकटात असताना एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने असे करणे नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.