लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून 4 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; 'या' नेत्यांचं तिकीट निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:25 PM2019-01-04T21:25:39+5:302019-01-04T21:28:15+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकूण सहा मतदारसंघांबद्दल चर्चा झाली. रायगड, जळगाव, कोल्हापूरमधील उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत. तर बीडमध्ये दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यातील एक नाव लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
रायगड, जळगाव, कोल्हापूर, बीड, रावेर आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारीबद्दल आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. यापैकी रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर जळगावातून अनिल पाटील आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी जयदत्त क्षीरसागर आणि अमरसिंग पंडित यांची नावं चर्चेत आहेत. रावेर आणि परभणी मतदारसंघाबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. मात्र अद्याप या मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झालेले नाहीत. या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी एकमत होण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.