Maharashtra Politics: “आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे राज्यभर बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:50 PM2023-02-23T20:50:37+5:302023-02-23T20:51:44+5:30
Maharashtra News: राष्ट्रवादीचे तीन नेते भावी मुख्यमंत्री म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागलेत, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस समोर येताना दिसत आहे. सुरुवातीला जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकताना दिसत आहेत. आधी जयंत पाटील, मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून पक्ष कार्यालयाबाहेर झळकले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, मनसेने या प्रकारावर खोचक टीका केली आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बॅनरबाजीवरून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे तीन भावी मुख्यमंत्री उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल. तीन भावी मुख्यमंत्री एकाच पक्षात असल्याने आता कार्यकर्ते सतरंज्या उचलणार का? असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागलेत
उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर राष्ट्रवादीचे नेते स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागले आहेत. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ते भावी मुख्यमंत्री असतील, असे बॅनर लागले होते. तो वाढदिवस संपत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील कोल्डवॅार काही नवीन नाही. आता सुप्रिया सुळे यांच्या नावानेही भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या बॅनरबाजीवरून खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की, भावी म्हणून सांगत असतात. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असे कधी कुणाला वाटले होते का? ते बनले त्यामुळे ज्याला-ज्याला भावी वाटतोय त्याला-त्याला शुभेच्छा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"