राष्ट्रवादीला चार, सेनेकडे दोन जागा
By admin | Published: June 9, 2017 02:51 AM2017-06-09T02:51:32+5:302017-06-09T02:51:32+5:30
तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमधील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध काढून राष्ट्रवादीने विजयी सलामी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमधील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध काढून राष्ट्रवादीने विजयी सलामी दिली. उर्वरित तीन जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत एका जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले तर दोन ठिकाणी शिवसेनेने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडली. त्यामुळे गोवे व तिसे या राष्ट्रवादीचा दोन ठिकाणी झालेला पराभव राष्ट्रवादी नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.
रोहा तालुक्यातील सहा जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत भालगाव ग्रामपंचायतीमधून संजीवनी मोहिते (राष्ट्रवादी), तांबडी ग्रामपंचायतीमधून दिव्या जाधव (राष्ट्रवादी), ऐनवहाळ ग्रामपंचायत सुनीता इंदुलकर (राष्ट्रवादी) या तिन्ही जागा बिनविरोध काढण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे छबी संभाजी म्हसकर (७७ मते) यांचा दारुण पराभव करीत कविता महाबळे (राष्ट्रवादी) यांनी सहजगत्या विजय खेचून आणला. एकूण ४३३ झालेल्या मतदानापैकी कविता महाबळे यांना ३५२ मते मिळवित ७७ मतांनी विजयी झाल्या आहेत.
तिसे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समिक्षा वडे यांनी २१५ मते मिळवत राष्ट्रवादीच्या सायली वडे यांचा १९ मतांनी पराभव केला. तर गोवे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचे संदेश झोलगे यांनी २३८ मते मिळवित राष्ट्रवादीच्या ऋ तुजा पवार (२१३ मते) यांचा २५ मतांनी पराभव केला. गोवेत पक्षातील गोंधळी कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. एकंदरीत सहापैकी तीन जागा बिनविरोध काढल्यानंतर तीन जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.