ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच नंबर १, शरद पवारांनी आकडेवारीसह काढली भाजपाच्या दाव्यातील हवा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:13 PM2022-09-21T14:13:28+5:302022-09-21T14:14:14+5:30
Grampanchayat Election Result: शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेत्यांकडून करण्यात येत असलेले दावे आकडेवारीसह खोडून काढत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले.
मुंबई - राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निकालांनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाने आपल्यालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेत्यांकडून करण्यात येत असलेले दावे आकडेवारीसह खोडून काढत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे सांगितले.
शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत.त्याची आकडेवारी काही पक्षांकडून वेगळी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीकडे असलेली अधिकृत माहिती आम्ही सर्व जिल्ह्यांमधून एकत्रित केली आहे. या माहितीनुसार एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १७३, काँग्रेसने ८४, भाजपाने १६८ आणि शिंदे गटाने ४२ ठिकाणी विजय मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अधिकृत आकडेवारी आम्हाला मिळालेली नाही. पण साधारणत: २७७ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर शिंदे गट आणि भाजपाला मिळून २१० जागी विजय मिळाला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
शरद पवार पुढे म्हणाले की, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण कार्यकर्त्यांना पुढे केलं होतं. त्यांनी या निवडणुकीत केलेली कामगिरी आमच्यासाठी समाधानकारक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त जागा निवडणूक आल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. मात्र तो त्यांचा भ्रम आहे. तसं असेल तर त्यांना भ्रमात राहू द्या, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.