Maharashtra Politics: “हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 09:01 PM2022-09-14T21:01:58+5:302022-09-14T21:03:08+5:30
अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे सांगत राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे.
Maharashtra Politics: दोन वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदू साधुंना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना जत तालुक्यातील मोरबगी लवंगा या ठिकाणी घडली आहे. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या शिंदे-भाजप सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.
साधूंच्या हिंदुत्वासाठी सरकार सोडले आणि साधूच या राज्यात सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल आहे. तसेच साधूंना मारहाण करणे हा प्रकार योग्य नसून, अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.
मारहाणीचे पडसाद सगळीकडेच उमटत आहेत
जत तालुक्यातल्या लवंगा येथे उत्तर प्रदेश येथील चार साधूंना मुले चोरणारी टोळी असल्याचे समजून जमावाकडून झालेल्या मारहाणीचे पडसाद सगळीकडेच उमटत आहेत. लवंगा गावात मथुरा (उत्तर प्रदेश) येथून गाडीतून आलेले जुना आखाड्याचे चार साधू पत्ता विचारत होते. तेव्हा ते लहान मुले पळवणारे आहेत, असा गैरसमज करून स्थानिक जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे.
दरम्यान, हिंदू जनजागृती समितीने याप्रकरणी तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. साधुसंतांची भूमी म्हणावणाऱ्या महाराष्ट्रात साधुंना सतत होणाऱ्या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे. निरपराध हिंदू साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.