चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी; जयंत पाटलांचे EDला पत्र, कंपनीसोबत व्यवहार केला नसल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 10:24 AM2023-05-12T10:24:59+5:302023-05-12T10:26:25+5:30
ED Notice To Jayant Patil: ईडीची नोटीस आली असून, चौकशीला सामोरे जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ED Notice To Jayant Patil: एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर अतिशय महत्त्वाचा निकाल दिला. यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. यातच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजवण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी ईडीला पत्र देऊन केल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस जारी केली असून, त्यांना १२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे.
चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी
आयएल ॲण्ड एफएस या संस्थेशी माझा कोणताही संबध नाही. त्यांच्याकडे कधी कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस प्राप्त झाली आहे तर चौकशीला सामोरा जाईन. पण सध्या जवळच्या लोकांची लग्न आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईन, असे पत्र ईडीला पाठविले आहे. ईडी नोटीस का पाठवते हे देशाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच नोटीस का आली, याचे मला आश्चर्य वाटत नाही. मला का लक्ष्य करण्यात आले हे समजत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील ईडीने चौकशी केली होती. ही नोटीस जारी करण्यात आली आहे.