Maharashtra Political Crisis: “एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 06:56 PM2022-09-07T18:56:21+5:302022-09-07T18:57:57+5:30
Maharashtra Political Crisis: यापूर्वी अनेकांनी बारामतीला टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
Maharashtra Political Crisis: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीति आखण्यास हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे भाजप विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असून, दुसरीकडे विरोधक भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी मजबूत आघाडी करण्यावर भर देताना दिसत आहेत. यातच राज्यातही भाजपने बारामतीसह अन्य लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले असून, केंद्रीय नेते त्या त्या मतदारसंघात जाऊन आढावा घेत आहेत. यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला असून, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव होणे शक्यच नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल. मात्र शरद पवारांची साथ बारामतीकर कधी सोडणार नाहीत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आतापर्यंत अनेकांनी बारामतीला टार्गेट केले, येथे खोदून पाहिले, पण पाणी काही लागले नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.
भाजपचे हे प्रचार तंत्र आहे
भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे यंदा 'मिशन महाराष्ट्र' बरोबर 'मिशन बारामती' असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचार तंत्र आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, वेळ लागू शकतो पण एवढा ही वेळ लागू नये,की विधानसभेची मुदत संपेल. आता याबाबत एकदा सुनावणी सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण करून निर्णय दिल्यास महाराष्ट्रातील सर्व गोष्टी क्लिअर होतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.