Jayant Patil : "जनतेला वाऱ्यावर सोडून हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त"; जयंत पाटलांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:20 PM2022-08-11T15:20:24+5:302022-08-11T15:30:40+5:30
NCP Jayant Patil : जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे असे आवाहनही जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी केले.
१७ ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी आज दिले. आज विधानभवनात विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले. गेल्या ४० दिवसापासून राज्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गोगलगायींचे आक्रमण वाढले आहे मात्र सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.