Jayant Patil, Winter Session at Nagpur: जयंत पाटील यांचे निलंबन; मविआ आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:12 PM2022-12-22T17:12:37+5:302022-12-22T17:13:12+5:30
सरकारचा निर्लज्जपणाचा कहर, भ्रष्टाचारी सरकार हाय हाय- अशा दिल्या घोषणा
Jayant Patil, Winter Session at Nagpur: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले. विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी गटातील सदस्यांनी केली होती. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जयंत पाटील यांच्या निलंबना विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निर्णयाचा निषेध केला.
महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो... निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर... जयंत पाटील, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी... भ्रष्टाचारी सरकार हाय हाय... खोके लेनेवालों, को जुते मारो सालों को... खोके सरकार हाय हाय... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने केली आणि आमदार जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन #हिवाळीअधिवेशन2022pic.twitter.com/gDiQ6mKSVx
— NCP (@NCPspeaks) December 22, 2022
महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी निलंबनाच्या निर्णयावर बोलताना सांगितले की, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना प्रश्न मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सभागृहात केला जात होता याचा निषेध करण्याचा प्रयत्न विरोधी आमदारांनी केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने सभात्याग करत पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंबनानंतर, "या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार... बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...!" असे ट्विट करत जयंत पाटील यांनीही संघर्ष करण्याचा संदेश दिला.
या निर्लज्ज 'सरकार' विरोधात लढत राहणार...
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 22, 2022
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय...!
याचवेळी, आमदार जयंत पाटील यांना उचलून घेत आमदारांनी 'जयंत पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है' अशी जोरदार घोषणाबाजी केली.