“छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 09:12 AM2022-05-29T09:12:42+5:302022-05-29T09:13:33+5:30
आर्यन खानची मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
ठाणे: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून राज्यात बराच खल झालेला पाहायला मिळाला. अनेक दावे-प्रतिदावेही झाले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजेंनी राज्यभा निवडणुकीतून माघार घेताना याचे खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले आहे. तर, दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी या घडामोडींसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. यातच आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळे आले, अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केले आहे. दुसरीकडे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे, मात्र शिवसेनेचे शिवधनुष्य त्यांना चालले नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले.
देशाची मान खाली जाणारे काम पंतप्रधान मोदींनी केले नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या आठ वर्षांत असे एकही काम केलेले नाही, की ज्यामुळे लोकांचे डोके शरमेने खाली जाईल, असे विधान केले होते. यावर, हे खरे आहे की मोदींनी कोणतेही असे काम केले नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल, किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने असे काम केलेले नाही, सत्तर वर्षांच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असेच काम प्रत्येक पंतप्रधानाने केले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आर्यन खानची मुक्तता हे डोळ्यात अंजन घालणारे ठरो
आर्यन खान यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आर्यन खानची मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे म्हटले आहे. एखाद्याच्या बालमनावर चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या घरच्या मुलाकडे बघून आपण विचार केला पाहिजे. ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे. या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही. त्यामुळे उपरवाला सब देखता हैं, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.