Jitendra Awhad : "बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:43 PM2022-09-07T13:43:21+5:302022-09-07T13:52:48+5:30
NCP Jitendra Awhad Slams Chandrashekhar Bawankule : "1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं."
भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत मोठं विधान केलं. "राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं", असे बावनकुळे म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
"बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते? असा खोचक टोलाही लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?"
बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
"बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही, उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत राहावा म्हणून…" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
"1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही" असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.