फॉर्मात आलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:53 PM2019-10-08T17:53:13+5:302019-10-08T17:56:19+5:30
एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गलीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षप्रमुख शरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले. पवारांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे तरुणांमध्ये पवारांविषयी आकर्षण वाटू लागले आणि त्यातून सहानुभुती तयार होऊ लागली. यामुळे राष्ट्रवादी मुसंडी मारणार अशी स्थिती निर्माण झाली असताना ऐन प्रचाराच्या काळात पक्षात सावळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसत आहे.
उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी सभेतूनच बीडचे पाच उमेदवार जाहीर करणे हा सर्वांसाठी धक्का होता. मात्र त्यातील एक उमेदवार भाजपमध्ये जाणे हे त्यापेक्षा धक्कादायक होते. या घटनेपासूनच राष्ट्रवादीत सावळ्या गोंधळाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार फुटण्याचा अनुभव याआधी बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला आला होता.
एक गोंधळ संपतो ना संपतो की उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे उमेदवारांसह मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा फंडा आणखी काही मतदार संघातही वापरण्यात आला होता.
दरम्यान चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने उमेदवाराला एबी फॉर्मच दिला नाही. तर भोसरीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचं होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित होत आहे. हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादीकडून चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घाई करण्यात आली. मात्र काँग्रेसने यापासून स्वत:ला वेगळ करून घेतलं.
या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. करमाळ्यातून संजय पाटील यांना तर सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. आता अजित पवारांवरच या उमेदवारांविरोधात भूमिका घेण्याची नामुष्की ओढवली. त्यांनी करमाळ्यात संजय शिंदे यांना तर सांगोल्यात शेकापचे अनिकेत देशमुख यांना पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविणारे संजय शिंदे आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.