Maharashtra Politics: “हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:42 AM2022-10-25T10:42:30+5:302022-10-25T10:43:02+5:30
यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे.
Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी कापणीला आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. त्यात दिवाळसण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी () यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाशी संवाद साधला. यावेळी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर अमोल मिटकरींनी टीका केली.
शेतकऱ्याच्या घरात आनंद नसेल तर तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छ्यांना काय अर्थ आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा आलेला नाही. सोयाबीन परतीच्या पावसाने सगळं संपवून टाकले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे तुम्ही काम करता. हेच का तुमचे हिंदुत्व, अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली आहे. अब्दुल सत्तार कृषिमंत्री आहेत. थोडीतरी शिल्लक असेल, तर बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे.
यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे
मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे. मला असे वाटते की यंदा शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना यंदा शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात कधी झाले नाही, असा दावा अमोल मिटकरींनी केला. तसेच माझी सरकारला विनंती आहे की, हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात यावे. नागपुरात अधिवेशन घेण्यात यावे, असा करार आहे. पण, विदर्भातील शेतकऱ्यांची यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. एका अधिवेशनाचा चारशे-पाचशे कोटी रुपये खर्च येतो. त्याऐवजी तो पैसा कापूस उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी यांना ते पाचशे कोटी रुपये देण्यात यावे. यंदा शेतकरी हवालदील झाला आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या यात्रेला लाखोचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आता अत्यंत अस्वस्थता माजली आहे, असा दावा करत गुणरत्न सदावर्ते यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सदावर्ते हा भाजपची कळसुत्री आहे. भाजप सदावर्तेसारख्या लोकांना पुढे करत आहे. सदावर्तेंना मी व्यक्ती मानत नाही ती एक प्रवृत्ती आहे. असा आरोप अमोल मिटकरींनी यावेळी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"