NCP vs BJP: लोक भारताचं नागरिकत्व का सोडत आहेत? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 02:37 PM2023-02-10T14:37:30+5:302023-02-10T14:39:52+5:30
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलं होतं उत्तर
NCP vs BJP: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांची वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची आणि नंतरची अशी आकडेवारी त्यांनी संदर्भासाठी सांगितली. त्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले. भाजपा सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. लोक भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी मोदी सरकारला केला.
"जयशंकर हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की गेल्या काही वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक प्रमाणात सारखीच होती. पण यात एक लक्षात घेणे आवश्यक आहे की २०२१ मध्ये सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे. गेल्या दशकातील नागरिकत्व सोडणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे, हे सरकारी आकडेवारी दर्शवते. परराष्ट्र मंत्र्यांनी जसे नागरिकत्वाबाबत २०१४ पूर्वीचे व नंतरचे दाखले दिले त्याप्रमाणेच आता बेरोजगारी, महागाई, जीडीपी आणि कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत इंधनाच्या किमती आदीचा २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा डेटा देखील दाखवावा," असे क्रास्टो यांनी आवाहन केले.
"भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरच आपला देश भारत कसा प्रगतीपथावर आहे आणि कसा समृद्ध झाला आहे, हे सतत ठसवले जात आहे. यावर विश्वास ठेवायचा असेल, तर प्रश्न असा पडतो की, मग लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत? भाजप सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात सर्वकाही ठीक चालले असेल, तर जगभरातील भारतीयांनी मोठ्या संख्येने भारतात परत यायला हवे. श्री एस जयशंकर कदाचित इतर सर्व डेटा देणार नाहीत. कारण सत्य हे आहे की, अनेक भारतीय आपले नागरिकत्व सोडत आहेत आणि भारतातील उच्च बेरोजगारीमुळे परदेशात निघून जात आहेत. ज्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आपली पडझड झाली होती. हे तथ्य सरकारी आकडेवारीनेच सिद्ध केले आहे, जी म्हणते की आपल्या देशातील ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.