शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 05:28 PM2020-03-08T17:28:22+5:302020-03-08T17:31:20+5:30
चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, शरद पवार जे करतात त्याची कल्पना सुद्धा पाटलांना येणार नाही.
मुंबई : एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकरणासाठी समाजात दुही निर्माण करू नयेत अशी टीका केली होती. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी पाटलांना प्रतिउत्तर दिले असून,शरद पवारांबाबत सांभाळून बोला असा इशाराही दिला आहे.
न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पाटील म्हणाले होते की, ज्यावेळी आम्ही संभाजीराजे यांची राज्यसभेवर नेमणूक केली, त्यावेळी 'पेशवे राजे ठेवायला लागले' असल्याचं वक्तव्य पवारांनी केले होते. त्यामुळे पवारांनी राजकरणासाठी समाजात दुही निर्माण करू नयेत असे पाटील म्हणाले होते.
चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, शरद पवार जे करतात त्याची कल्पना सुद्धा पाटलांना येणार नाही. त्याच्यातून जो काय संदेश द्यायचा ते त्यातून देतात. शरद पवार याचं अर्ध आयुष्य राज्यात आणि अर्ध दिल्लीत नेतृत्व करण्यात गेल आहे. त्यामुळे पाटील यांनी राज्यस्तरीय नेत्यांवर काय ती टीका करावी, पण पवारांबाबत सांभाळून बोलावं असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
भाजपची सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहे. शिवसेनेसोबत पवारांनी सत्तास्थापन केल्याने टीका करणाऱ्या भाजपने मध्यप्रदेश, कर्नाटकमध्ये काय केलं ? लोकशाहीच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षातील लोकं फोडून सरकार बनवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आपण काय करतो यांना आठवत नाही का ? असा खोचक टोलाही भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना लगवाला.