Maharashtra Politics: “तुमची उंची किती, त्यांची उंची किती? भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, अन्यथा...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 09:06 PM2022-09-09T21:06:31+5:302022-09-09T21:07:34+5:30
Maharashtra Politics: भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: एकीकडे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, दुसरीकडे राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीवरही भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली असून, भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, असा सल्ला दिला आहे.
राज्यात अनेक विघ्न आहेत. ही विघ्न या सरकारने दूर करावीत. बेरोजगारी, महागाई अशा अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मुसळधार पाऊस पडतो आहे. हेही विघ्न या सरकारने दूर करावीत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकविध गणपती मंडळांना दिलेल्या भेटींबाबत बोलताना, आता उत्सवांमध्येही प्रचाराचे नारळ फोडले जात आहेत. नक्की गणेशदर्शन सुरू आहे की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, अन्यथा...
तुमची उंची किती आहे, त्यांची उंची किती आहे काही तरी विचार करा. मग त्यावर डोके आपटा. भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये. हे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. वेळेची आणि उर्जेचा अपव्यय आहे. त्यांनी तेवढा वेळ आणि शक्ती दुसरीकडे कुठेतरी लावावी. भलत्यासलत्या ठिकाणी कुठे जात आहात, अशी टीका भुजबळांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. तत्पूर्वी, खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. बारामतीमध्ये माझे काम बोलते. तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर केली.
दरम्यान, आताच्या घडीला बारामती पवारमुक्त करायची. मुंबई ठाकरेमुक्त करायची, या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, असे सांगत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.