Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:16 PM2023-02-10T16:16:23+5:302023-02-10T16:16:58+5:30

Maharashtra Politics: नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा करण्यात आला आहे.

ncp leader chhagan bhujbal criticised congress after shiv sena thackeray group | Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

Maharashtra Politics: “...तेव्हा कुणालाही विश्वासात घेतलं नाही”; ठाकरे गटानंतर NCPच्या नेत्याची काँग्रेसवर टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या दिलेल्या राजीनाम्यावरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाना पटोले यांच्या या राजीनाम्यावर भाष्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा कुणालाही विश्वासात घेतले नाही. त्यानंतर इतर पेच निर्माण झाले आणि सरकार कोसळले, असे छगन भुजबळ म्हणाले. 

कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार कोसळले. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या, असा दावा छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना केला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते असे म्हणता तर तुमचे नेतृत्व कमी पडत होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचे नेतृत्व कमी पडत होते का? असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असा टोला नाना पटोलेंनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader chhagan bhujbal criticised congress after shiv sena thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.