हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:40 PM2023-11-20T12:40:59+5:302023-11-20T12:41:37+5:30

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेचं कारणही सांगितलं आहे.

NCP leader Chhagan Bhujbal hits back to Congress leader Vijay Wadettiwar over maratha and obc reservation | हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

नाशिक -मराठा आरक्षण प्रश्नावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक अधिकच वाढत असल्याचं चित्र आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड येथे जाहीर सभा घेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र या सभेनंतर आता ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. जालन्यातील सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली असून त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत, असं काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून जे सोबत राहतील, त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ, असा निर्धार व्यक्त केला आहे.

"कोणी काय भूमिका मांडली, हे मला माहीत नाही. मात्र मी मराठा समाजाच्या विरोधात काहीही बोललेलो नाही. मी फक्त मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं. कारण मागील दोन महिन्यांपासून ते माझ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका करत होते. तसंच काही लोकांनी तर जाळपोळ, दगडफेकही सुरू केली होती. हे दृष्य अत्यंत भयंकर होतं. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं होतं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी माझ्यासहित सगळ्यांचीच भूमिका आहे. पण जेव्हा विविध पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येत असतात, तेव्हा काही मतभेद होत असतात, हे मला मान्य आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण न देता वेगळं आरक्षण द्यावं, या भूमिकेशी तर सगळे सहमत आहेत," असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "मी काय टोकाची भूमिका मांडली, हे विजय वडेट्टीवार यांनी मला सांगावं. मनोज जरांगेंनी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत, त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे मी त्यांच्यावर बोललो. जरांगे यांनी १४ सभा घेतल्यानंतर मी एक सभा घेतली. मी टोकाची भूमिका कुठे घेतली? मला कोणी वैयक्तिकरित्या बोलत असेल तर मी प्रत्युत्तर देणारच. माझी भूमिका सगळ्यांना टोकाची वाटत आहे, मात्र मनोज जरांगे नक्की काय बोलत आहे, ते सगळ्यांनी पाहावं. त्यांनी कितीही आक्रमक बोललं तरी लोकांना ते टोकाचं वाटत नाही. तुमच्या हिंमत असेल तर जरांगेंच्या वक्तव्यावर बोला," असं प्रतिआव्हानही भुजबळ यांनी टीकाकारांना दिलं आहे.

हेमंत गोडसेंवरही पलटवार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सत्ताधारी महायुतीतही दोन गट पडले आहेत. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर जोरदार प्रहार केला. "जालन्यातील ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी मराठा समाजाबाबत चुकीची आकडेवारी दिली," असा आरोपही हेमंत गोडसेंनी केला. या आरोपाला आता छगन भुजबळांनी उपरोधिक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. "माझ्यापेक्षा हेमंत गोडेसे यांचा अभ्यास जास्त असावा. त्यामुळे कदाचिक मी शिकेन त्यांच्याकडून," असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Web Title: NCP leader Chhagan Bhujbal hits back to Congress leader Vijay Wadettiwar over maratha and obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.