Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:50 PM2023-03-28T12:50:14+5:302023-03-28T12:50:38+5:30
Chhagan Bhujbal Corona Positive : गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
छगन भुजबळ हे सोमवारी येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच, सध्या छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
नाशिकमधील येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर लगेच त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना थंडी, ताप असल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे सातत्याने रुग्ण वाढत असताना जोडीला एच3 एन2 या नवीन विषाणूचेही आढळून येत असल्याने केंद्रासह राज्य सरकारने सतर्कतेचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात 397 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 10,300 इतकी झाली आहे.