विधानसभेतील वाक्-युद्धानंतर छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, एक तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:55 AM2021-07-15T10:55:12+5:302021-07-15T10:56:28+5:30
विधिमंडळाच्या अलीकडे झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि फडणवीस यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाक्युद्ध रंगले होते.
यदु जोशी -
मुंबई - राज्याचे ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली ही भेट राजकीय स्वरूपाची होती, अशी चर्चा असली तरी दोघांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाली असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने एसईसीसी डाटा उपलब्ध करून दिल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा तयार करणे अधिक सोपे जाईल, अशी भुजबळ यांची भूमिका आहे. हा डाटा केंद्र सरकारने महाराष्ट्राला द्यावा अशा मागणीचा ठराव राज्य विधिमंडळाने अलिकडेच मंजूर केला होता.केंद्र सरकारकडे आणि विशेषता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फडणवीस यांनी वजन वापरावे आणि हा डाटा महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटून केली.
ओबीसींचा डाटा केंद्र सरकारने तत्काळ जाहीर करावा; काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची मागणी
तुमच्या नेतृत्वात पंतप्रधानांकडे जाण्याची आमची तयारी आहे, असे भुजबळ या भेटीत फडणवीस यांना म्हणाले त्यावर राज्यात आपले सरकार आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदी यांना आपल्या नेतृत्वात भेटावे. सोबत मी शंभर टक्के राहीलच असे फडणवीस यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत पुन्हा बहाल झाले पाहिजे यासाठी एकदिलाने काम करण्याची भावना दोन्ही नेत्यांनी या भेटीत व्यक्त केली.
विधिमंडळाच्या अलीकडे झालेल्या अधिवेशनात भुजबळ आणि फडणवीस यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाकयुद्ध रंगले होते. मात्र आज दोघांनीही एकत्र येत ओबीसी आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची संकेत दिले.