“कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या, कशा काय तिकडे गेल्या कळत नाही”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:50 PM2023-06-19T13:50:37+5:302023-06-19T13:56:03+5:30
Manisha Kayande Shiv Sena Shinde Group: मनिषा कायंदे यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Manisha Kayande Shiv Sena Shinde Group: शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. पैकी मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गट आक्रमक झाला असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मनिषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या. उद्धव ठाकरेसोबत राहतील असे वाटते होते. पण त्या शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
खरी शिवसेना कोण? हे निवडणुकीत लोक ठरवतील
खरी शिवसेना कोण? हे निवडणुकीत लोक ठरवतील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्या मनात कायम राहील. शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा! शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आम्ही घोषणा देत जायचो. मिळेल त्या वाहनाने जायचो. १९७८ साली शिवसेनेचा गटनेता झालो. बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी दिली. शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या, महापौर, आमदार झालो. शिवसैनिकांना शुभेच्छा! सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र, असे सांगत छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, ठाकरे गटाला गळती लागलेली दिसत आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता छगन भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे जुने नेते, शिवसैनिक आहेत. ते चर्चा करू शकतात. गळती थांबवू शकतात. त्यामुळे त्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.