नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:34 PM2022-04-27T16:34:44+5:302022-04-27T16:39:39+5:30
नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
“नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भातील मागणी केली. “मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाखाचा जमीन व्यवहार केला त्याच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही. मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ ८० लाख रुपये घेतले आहेत. याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी दिली आहेत,” असेही छगन भुजबळ म्हणाले.
“नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले ते कशासाठी घेतले, कुणाच्यावतीने घेतले याचीही मुंबई पोलिसांनी व बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी,” असेही छगन भुजबळ म्हणाले. नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत याबाबत हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत असं हायकोर्ट बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. मूळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
काय अन्याय केला?
नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असं बोलत आहेत. काय अन्याय केला असा सवाल करतानाच तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिले आहे असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. पोलीस ठाण्यात अन्याय झाला म्हणतात मग पोलिसांविरुद्ध त्यांची तक्रार नाही असे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद असल्याचे पत्र छगन भुजबळ यांनी दाखवतानाच मग यांच्यावर अन्याय काय झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे.