रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी छगन भुजबळ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 01:09 PM2023-03-05T13:09:12+5:302023-03-05T13:09:40+5:30

पोलिसांनी त्यांचे काम चोख करायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.

NCP leader Chhagan Bhujbal's reaction to the attack on MNS leader Sandeep Deshpande | रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी छगन भुजबळ काय म्हणाले?

रोज रोज लोकांना डिवचण्याचं काम...; संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी छगन भुजबळ काय म्हणाले?

googlenewsNext

नाशिक - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विधानसभेतही भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी हा मुद्दा सभागृहात आणला होता. या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मनसेकडूनही केली जात आहे. त्याचसोबत या प्रकारामुळे मनसे-ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यातच छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ म्हणतात की, महाराष्ट्रात असे प्रकार होऊ नयेत आणि मुद्दामाहून रोज रोज लोकांना डिवचण्याचं कामसुद्धा होऊ नये. दोन्ही गोष्टींनी संयम पाळायला पाहिजे आणि पोलिसांनी त्यांचे काम चोख करायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होईल
रत्नागिरीत खेड तालुक्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला निश्चितपणे गर्दी जमेल. शिवसेना उभी राहण्यात कोकणच्या लोकांचा मोठा वाटा आहे. कोकणातील अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार झाले. शिवसेनेचे नेते दुसरीकडे गेले तरी मतदार आणि कार्यकर्ते हलत नाहीत असा अनुभव आहे. उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती मिळतेय हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अमरावती, नागपूर, कसबा येथे महाविकास आघाडीला विजय मिळाला असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. 

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर
केंद्रीय तपास यंत्रणांचे सर्रासपणे अतिरेक सुरू आहे. सर्वच ठिकाणी गैरवापर होत आहे हे सगळेच उघड आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार असलं तरी काहीतरी खुसपट काढून अटक वैगेरे सत्र सुरू ठेवायचे. महाराष्ट्रात आम्ही अनुभव घेतलाय. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनादेखील हा अनुभव येत आहे असा टोला छगन भुजबळांनी भाजपाला लगावला. 

कांद्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती
कांदा दरामुळे सध्या अतिशय वाईट परिस्थिती सुरू आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही विधानमंडळात आवाज उठवत आहोत. कधी कधी नाफेड देखील व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करतो. व्यापारी दोनशे तीनशे रुपयांनी घेतो आणि नाफेडला पाचशे रुपयांनी देतो त्यामुळे नाफेडने थेट बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी केला पाहिजे. म्हणजे व्यापारी देखील भाव वाढवतील. बाहेरून खरेदी करून काही उपयोग नाही. नाफेडची जी आकडेवारी सांगितली जाते, ती चुकीची आहे. यावर विधानसभेत पुन्हा बोलू असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: NCP leader Chhagan Bhujbal's reaction to the attack on MNS leader Sandeep Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.