पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्याचं काय होईल?; धनंजय मुंडेंचं अवघ्या चार शब्दांत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:51 PM2019-12-12T16:51:35+5:302019-12-12T16:55:10+5:30
पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आक्रमक भाषण करत राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. पंकजा यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. परळीत माझ्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ताकद देण्यात आली, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. मात्र त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेणं टाळलं. पंकजांच्या या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल, अशा शब्दांत पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. 'माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आल्याचं त्या (पंकजा मुंडे) म्हणतात. त्यामुळे आम्ही ताकदवान होतो, हे तरी किमान त्या मान्य करतात. सत्ता नसतानाही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो, यातच सगळं आलं. मतदार त्यांच्यावर नाराज होते, हे त्यांनी मान्य करायला हवं,' अशा मोजक्या शब्दांमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजांना प्रत्युत्तर दिलं.
पाच वर्ष सत्ता असूनही गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधता आलं नाही, अशा शब्दांत पंकजांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. तोच धागा पकडत धनंजय यांनी पंकजांना लक्ष्य केलं. पाच वर्षे सत्ता असूनही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधू शकल्या नाहीत. मात्र आमचं सरकार मुंडे सरकारचं स्मारक उभारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून पंकजांनी आज त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण करुन दिली. निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.