“फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”; नाथाभाऊ स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:56 PM2023-09-16T13:56:58+5:302023-09-16T13:57:59+5:30

Eknath Khadse Vs Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

ncp leader eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis | “फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”; नाथाभाऊ स्पष्टच बोलले

“फडणवीस माझ्यामुळेच CM झाले, त्यांची सूडवृत्ती अशोभनीय आहे”; नाथाभाऊ स्पष्टच बोलले

googlenewsNext

Eknath Khadse Vs Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याने दोन गट झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा भाजपवर टीका केली आहे. यातच पुन्हा एकदा नाथाभाऊंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, देवेंद्र फडणवीस माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांची सुडाची वृत्ती अशोभनीय आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवल्या. २०१४ च्या आधी विरोधी पक्षनेता असताना माझ्या मागची जागा त्यांना दिली. माझ्याऐवजी त्यांना बोलण्याची अनेकवेळा संधी दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यामध्ये त्यांचेदेखील कौशल्य होते. मात्र, नंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी केली. ज्या व्यक्तीला घडविले, त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करणे योग्य वाटत नाही, या शब्दांत एकनाथ खडसे यांनी खंत बोलून दाखवली. 

देवेंद्र फडणवीसांची सुडाची वृत्ती राजकारणासाठी अशोभनीय

देवेंद्र फडणवीसांना राजकीय नेते म्हणून घडविण्यात व भाजपा प्रदेशाध्यक्ष करण्यात माझा मोठा हात होता. त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. कालांतराने त्यांनी कुरघोडी केली. राजकारण आपल्या जागी आहे. मात्र, फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे, असे सांगत एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, मनोबल खच्चीकरणाच्या प्रकारामध्ये विनोद तावडे सावरले आहेत, ते राष्ट्रीय राजकारणात रुळले आहेत. मात्र, पंकजा मुंडे आणखी संभ्रमावस्थेत आहेत. त्या निर्णय घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे. पंकजा मुंडे परिपक्व आहेत, त्या लवकरच निर्णय घेतील, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: ncp leader eknath khadse criticised bjp dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.