Maharashtra Politics: “चंद्रकांत पाटलांनी आत्ताच निवृत्ती घ्यावी, पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?”; एकनाथ खडसेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 01:21 PM2022-10-02T13:21:09+5:302022-10-02T13:22:00+5:30
Maharashtra News: चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधताना दिसत असून, शिंदे गट आणि भाजपचे नेतेही महाविकास आघाडीच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेताना दिसत आहेत. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) टीका केली आहे.
पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या निवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक शब्दांत टोला लगावत डिवचले आहे.
पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?
पाच, दहा वर्षे कशाला पाहिजे? आताच घ्या ना. चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या; मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे वाटल्याने राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असे एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, रक्ताची नाते कधी संपत नसतात, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना उद्देशून केले होते. यावर बोलताना, पंकजा मुंडे यांनी काही तरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही. राजकारणात नाते जोपासले पाहिजे. यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"