NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:38 PM2023-04-12T12:38:36+5:302023-04-12T12:40:21+5:30
चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
मुंबई - बाबरी पाडल्याच्या घटनेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी हे विधान टाळायला हवं होते. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे असं सांगत भाजपाने या वादात हात वर केले आहेत. तर दुसरीकडे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाची पाठराखण केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे. बाबरीचं जे आंदोलन झाले. कारसेवक म्हणून अनेकजण तिथे गेले होते. त्यात मीही सहभागी होतो. १५ दिवस मला तुरुंगवास भोगावा लागता. पोलिसांनी मला मारहाणही केली होती. दोन्ही वेळेस त्या आंदोलनात फार कमी प्रमाणात शिवसैनिक होते हे मी स्वत: अनुभवले आहे. शिवसेनेचे मंत्री कोण उपस्थित होते, जे आले तेदेखील उशीरा आले. सुभाष देसाई त्यात होते. सगळे झाल्यावर आले होते. कारसेवक म्हणून आम्ही गेलो, पायी गेलो, ट्रेनने गेलो. पोलिसांचा मार खाल्ला, अत्यंत वाईट वागणूक दिली. तुरुंगवास भोगला, त्यावेळी किती शिवसैनिक होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच बाबरी ढाचा पडल्यानंतर त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? तेव्हा भाजपा ती जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहत होती. आम्ही पाडलंय हे म्हणण्याचे धैर्य भाजपात नव्हते. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी होय, बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं विधान केले. हे आंदोलन खूप वर्ष चालले. शिलापूजन, जलपूजन, गंगाजलपूजन झाले वैगेरे ८५-८६ पासून आम्ही या आंदोलनात सहभागी होतो. यात बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तोपर्यंत शिवसेनेचा सहभाग फार कमी दिसला असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेंचा पलटवार
चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून वाद पेटल्यानंतर यावर उद्धव ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ पाहा. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली.