"आम्ही ठेवणीतल्या शिव्या दिल्यास गोपीचंद पडळकरांना रात्रभर झोपही लागणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 05:39 PM2020-06-28T17:39:45+5:302020-06-28T17:42:11+5:30
शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले की, बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. गोपीचंद पडळकरांना आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. तसेच गोपीचंद पडळकरांच्या विधानामागे बोलवते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आहे, असा आरोप देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते.
गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-
शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.