महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का?; राष्ट्रवादीचा थेट सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:41 PM2022-12-16T12:41:47+5:302022-12-16T12:43:13+5:30

कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमावाद काढला जात आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातलीच आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.

NCP leader Jayant Patil criticized CM Eknath Shinde and BJP | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का?; राष्ट्रवादीचा थेट सवाल 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का?; राष्ट्रवादीचा थेट सवाल 

Next

सांगली - कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्विट नव्हे. हे किती धादांत खोटे आहे. हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्विट त्यांचे नाही. ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही? ज्या दिवशी ट्विट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही त्यामुळे आमचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. 

जयंत पाटील म्हणाले की, विकासाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. हे आमदार मॅनेज करणारे सरकार आहे. जनतेशी यांना काही देणे घेणे नाही. कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमावाद काढला जात आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातलीच आहे. ती महाराष्ट्राच्या हिताची भूमिका नाही. निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत हा वाद असाच ठेवणार असं त्यांनी सांगितले. 

महामोर्चाची गर्दी पाहून धडकी भरेल
मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपला महामोर्चात मिळेल. राज्यभरातून तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे अशा मुंबईच्या जवळ असलेल्या भागातील लोकं लाखो संख्येने येणार आहेत. महाराष्ट्र प्रेमी संपूर्ण ताकदीने मोर्चात उतरणार आहे. महामोर्चाची गर्दी पाहून नक्कीच राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरेल. हे सरकार भित्रे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकार का घेत नाही? सरकारला कसली भीती आहे? असा टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. 

खरा इतिहास पुसण्याचं कारस्थान
महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका-एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही. अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे असे काही लोकांना वाटते. त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. 

भाजपा नेत्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल
महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल. कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहे. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपाच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपाने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. 

Web Title: NCP leader Jayant Patil criticized CM Eknath Shinde and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.