Maharashtra Politics: “पुढील वर्षी महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देणार”; भाजप-शिंदे गटाला टोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 09:29 AM2023-01-25T09:29:18+5:302023-01-25T09:30:44+5:30

Maharashtra News: शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ncp leader jayant patil said maha vikas aghadi will give surprise to dcm devendra fadnavis | Maharashtra Politics: “पुढील वर्षी महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देणार”; भाजप-शिंदे गटाला टोला!

Maharashtra Politics: “पुढील वर्षी महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देणार”; भाजप-शिंदे गटाला टोला!

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यपालांची राजीनामा देण्याची इच्छा, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिडवणूक यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून भाजप-शिंदे गटाला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. यातच पुढच्या वर्षी महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सरप्राइज देणार आहोत, असा सनसनाटी टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला.

लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोक आता हुशार झालेत.  आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल आणि फडणवीसांसाठी आमच्याकडून सरप्राइज असेल, असे जयंत पाटील म्हणाले. 

शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती

शिवसेनेचे एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होईल. शिवसेनेच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू असे मी कधीही म्हणालेलो नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader jayant patil said maha vikas aghadi will give surprise to dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.