एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:50 PM2021-11-12T16:50:33+5:302021-11-12T16:50:54+5:30
भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये, पाटील यांचा आरोप
"एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
"आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत," अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनीही केलं होतं आवाहन
"एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे," असे उद्धव ठाकरे यापूर्वी म्हणाले होते.