“भारतात बसून यान चंद्रावर उतरु शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं”: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:45 AM2023-08-26T10:45:34+5:302023-08-26T10:47:13+5:30
विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Jitendra Awhad News: देशातील अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यातच भाजप नेत्यांनी केलेल्या एका विधानामुळे ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
तेलंगणात भाजप नेते आणि निजामाबादचे खासदार डी.अरविंद यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. लोक इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू शकतात किंवा नोटा बटण दाबू शकतात, परंतु निवडणूक मीच जिंकणार. तुम्ही काँग्रेसला मत दिले तरी कमळाचा विजय होईल, असा मोठा दावा अरविंद यांनी केला. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यावरून टीका केली आहे.
...तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकते
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवले गेले. आणि त्यात यशस्वी देखिल झाले. मग EVM च्या मार्फत मतदान कोणाला करायचे हे ठरवणे काय अवघड आहे. जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकते, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकते. विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
दरम्यान, देशात आधीच ईव्हीएमवरून वाद निर्माण झाला होता. यात आता भाजप खासदाराच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणाला अधिक महत्त्व मिळू शकते. विरोधी पक्ष मागील निवडणुकीतही ईव्हीएममधील गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा स्थितीत डी. अरविंद यांचे हे विधान भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे.