अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:42 PM2022-11-10T15:42:05+5:302022-11-10T15:43:29+5:30

मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

NCP Leader Jitendra Awhad Reaction on Demolition around Afzal Khan's tomb structure | अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

googlenewsNext

नांदेड - कसंही करून समाजात दुफळी माजवायची हे सरकारकडून होत असेल तर दुर्दैवी आहे. सर्व समाजाला एकत्र ठेवणे ही केंद्र आणि राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी झुगारून देत असाल तर त्याला काय बोलणार? अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी अफजल खानाच्या कबरीजवळील तोडक कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतिहास बघताना त्या नजरेने बघा, अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मराठीविरुद्ध मराठा ही लाईन हर हर महादेव सिनेमाची आहे. मराठ्यांचे शौर्य आहे हे कुणी नाकारून चालणार नाही. मराठ्याच्या नेतृत्वात सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र लढले. मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात. ऐतिहासिक चित्र तुमच्या नजरेत बसलेले असते. त्या प्रतिमा वेड्यावाकड्या दाखवू शकत नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवू शकत नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

चित्रपटांचा लोकांवर प्रभाव पडतो
हर हर महादेव सिनेमात बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवली. त्याचे समर्थन करताना काहीजण दिसले. अफजल खानाला कसा मारला हे लहान पोरांनाही माहित्येय. कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलं. हा इतिहास असताना चित्रपटात मांडीवर बसून त्याचा कोथळा बाहेर काढताना दाखवतात. कशाला असं दाखवता? विकृतीकरण करू नका. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदरचा तह झाला हा इतिहास आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला हा इतिहास आहे. शिवराज्यात महिलांचा व्यापार होत होता हे दाखवता? नवीन पिढी आहे. इतिहासाचे दाखले फटाफट बाहेर पडतात. जेम्स लेनचं पुस्तक आले त्याला विरोध झाला नसता तर त्यावर काहींनी पीएचडी केली असती. पुरंदरेंना विरोध केला नसता तर लोकांच्या लक्षात आले नसते. आमचा चित्रपटाला विरोध नाही त्यात काय दाखवलाय हे सांगतोय. जो सेवक ज्याच्यावर शिवरायांचा पराकोटीचा विश्वास होता ते शिवरायांशी लढताना दाखवलेत कसं शक्य आहे? तामिळनाडूचं राजकारण चित्रपटावर गेले. चित्रपटातून प्रतिमा निर्माण केली आणि राजकारणात ते प्रभावी ठरले. दाक्षिणात्य नेत्यांना देव मानलं जाते असं आव्हाडांनी म्हटलं. 

द्वेषाने देश तुटेल, भारत जोडो यात्रेचा उद्देश महत्त्वाचा
महाविकास आघाडी तुटली नव्हती. काहीजण स्वप्नरंजन करत असतात. त्याला उत्तर देण्याची गरज नसते. वेळोवेळी त्याचे उत्तर मिळते. या देशाची विचारधारा सर्वधर्म समभावाची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. ही विचारधारा टिकली तर भारत टिकेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. द्वेषाने हा देश तुटेल. माणसं माणसाला जोडली पाहिजे. महात्मा गांधी, नेहरूंनी जात धर्म विसरून स्वातंत्र्यांचा लढा दिला. द्वेषाच्या राजकारणातून बाहेर पडून मूळ भारत होता. तो परत आला पाहिजे. ज्या उद्देशाने भारत जोडो यात्रा निघाली तो महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये विरोधाभास दिसतोय. केंद्र आणि राज्य संबंध ज्यारितीने ताणले जातायेत ते विकासासाठी चांगले नाही असं सांगत आव्हाड भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: NCP Leader Jitendra Awhad Reaction on Demolition around Afzal Khan's tomb structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.