एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी: जितेंद्र आव्हाड
By देवेश फडके | Published: February 2, 2021 08:54 PM2021-02-02T20:54:21+5:302021-02-02T20:56:25+5:30
महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला माफी नाही, असे म्हटले आहे.
जानेवारी महिन्यात पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी याने वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) शरजिल उस्मानीविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, अतुल भातखळकर यांनी शरजिल उस्मानीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी ...भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2021
माफी नाही
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एल्गार परिषदेत झालेल्या प्रकारावर भूमिका मांडली आहे. ''एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी. भावना दुखावणाऱ्या वक्तव्याला माफी नाही'', असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हिंदूंचा अवमान करणार्या विधानावर तत्काळ कारवाई करा
पुण्यातील एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत; निलेश राणेंची टीका
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजिलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.