'नेत्यांचे तळवे चाटण्याची गोयलांनी मर्यादा ओलांडली': मेहबूब शेख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:32 PM2020-01-14T16:32:02+5:302020-01-14T16:35:14+5:30
अंधभक्त आणि तळवे चाटणारी लोकं शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याच्या प्रयत्न करीत असतील तर नरेंद्र मोदींनी याचे आत्मपरीक्षण करायले हवे असेही मेहबूब शेख म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळी देखील पंतप्रधान मोदी आणि पुस्तक लिहिणाऱ्यांवर टीका करत आहेत. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुद्धा याच मुद्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे एक पुस्तक प्रकाशित झाले. असे पुस्तक प्रकाशित करून भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आपल्या नेत्यांच्या किती तळवे चाटावे याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याची जहरी टीका यावेळी मेहबूब शेख यांनी केली आहे.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जातीवादी आणि दंगलखोर असलेल्या नरेंद्र मोदींसारख्या व्यक्ती सोबत केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे सुद्धा शेख म्हणाले.
तसेच शिवाजी महाराज यांच्या नखाची सुद्धा मोदी हे बरोबरी करू शकत नाही. मात्र तरीही त्यांचे अंधभक्त आणि तळवे चाटणारी लोकं शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याच्या प्रयत्न करीत असतील तर नरेंद्र मोदींनी याचे आत्मपरीक्षण करायले हवे असेही मेहबूब शेख म्हणाले.
आज के शिवाजी,नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना केल्याने देशभरातून संताप व्यक्त होतोय.आज उस्मानाबाद इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या पुतळ्यास जोडे मारून व त्याचे दहन करुन निषेध व्यक्त केला. pic.twitter.com/Q4mf6QNIkx
— NCP (@NCPspeaks) January 14, 2020
तर जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे.