"शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट"; नवाब मलिकांची टीका
By देवेश फडके | Updated: January 27, 2021 16:15 IST2021-01-27T16:12:22+5:302021-01-27T16:15:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) हात असल्याचा आरोप केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

"शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट"; नवाब मलिकांची टीका
मुंबई : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारावरून आता राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) हात असल्याचा आरोप केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली गेली. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला. भाजपशी संबंधित दीप सिद्धूने तिथे ध्वज फडकवण्याचे काम केले. याच दीप सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे यापूर्वीच शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. ट्रॅक्टर रॅली दिल्लीत आली आणि लाल किल्ल्यावर पोहोचली. आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा ध्वज काढून आपला ध्वज फडकवला, ही बातमी चुकीची आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलिसांत पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली. दरम्यान, दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे.
योगेंद्र यादव, भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. मात्र, दीप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात तब्बल ३०० पोलीस जखमी झाले असून, या प्रकरणी २०० जणांना अटक करण्यात आली आहे.