'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:09 AM2021-10-17T06:09:19+5:302021-10-17T07:59:30+5:30
समीर वानखेडेंची बहीण अन् फ्लेचर पटेल यांचेही प्रत्युत्तर
मुंबई : एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन यांच्या फोटोसह ट्वीट करीत त्यांना ‘माय सिस्टर, लेडी डॉन’, असे संबोधणारे फ्लेचर पटेल यांच्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.
फ्लेचर पटेल यांच्यासोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे, या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय, तिचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे, असे सवाल मलिक यांनी समीर वानखेडे यांना केले आहेत. त्यावर यास्मिन पटेल यांनी उत्तर दिले आहे. माझा भाऊ चांगले काम करीत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे, वकिली करते. उगाच निराधार आरोप करू नका. पुरावे द्या आणि मग बोला, असे आव्हान यास्मिन यांनी नवाब मलिक यांना दिले आहे. नवाब मलिक यांनी भविष्यात असेच आरोप केले तर आपण त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, कायदेशीर नोटीस तर पाठविणार आहेच, असे यास्मिन म्हणाल्या.
ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करीत आहे का? तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. ‘माय सिस्टर लेडी डॉन’ अशा उल्लेखासह टॅग करीत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? एनसीबीच्या तीन केसेसमध्ये पटेलच पंच कसे झाले? हे त्यांनी सांगावे, असेही मलिक म्हणाले.
तरुणांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी मदत
फ्लेचर पटेल यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले, ‘मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठे आणि चांगलं काम करीत आहेत. सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून एनसीबीला मदत करीत असतो. देशात अमली पदार्थ आणून तरुण पिढीला व्यसनी केले जात आहे. ते रोखण्याचे काम एनसीबी करीत आहे, असे फ्लेचर पटेल यांनी सांगितले.
वानखेडे म्हणतात ‘माझ्या शुभेच्छा, सत्यमेव जयते’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मात्र मौन बाळगणे पसंत केले आहे. शनिवारी मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपाबद्दल त्यांना ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ या मोजक्या शब्दांत समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत अधिक भाष्य करणे टाळले.