पंतप्रधानांनी स्वतः लस घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी : नवाब मलिक
By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 06:50 PM2021-01-11T18:50:00+5:302021-01-11T18:53:12+5:30
लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका, विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी पहिले लस टोचून घ्यावी, मलिक यांचं वक्तव्य
येत्या १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. तसंच सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती. परंतु त्यानंतर देशात या लसीकरणावरून राजकारणास सुरूवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेऊन या लसीकरण मोहिमेची सुरूवात करावी अशी मागणी केली आहे.
"१६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल," असंही नवाब मलिक म्हणाले.
३ कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च सरकार करणार
"राज्यांसोबत चर्चा केल्यानंतरच लसीकरणाला कोणाला प्राधान्य द्यायचं हे ठरवलं जाणार आहे. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनंतर फ्रन्टलाईन वर्कर्सना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा खर्च राज्यांना उचलावा लागणार नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादादरम्यान सांगितलं. "कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि दुसरा डोस दिल्यानंतर अंतिम प्रमाणपत्र दिलं जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.