महापालिका आयुक्त की राष्ट्रवादीचे नेते?
By admin | Published: August 6, 2016 01:12 AM2016-08-06T01:12:06+5:302016-08-06T01:12:06+5:30
विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत आहेत.
पिंपरी : विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत आहेत. महापालिकेत सत्ता असल्यामुळे चुकीची कामेही राजकीय स्वार्थापोटी रेटून नेण्याची राष्ट्रवादीची शैली आहे. याच शैलीनुसार महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहरातील करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे वाघमारे महापालिकेचे आयुक्त आहेत की राष्ट्रवादीचे नेते, असा प्रश्न थोरात यांनी केला आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानकालगत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर खारूताई, श्वान आणि पाळीव पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे. आयुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावरून थोरात यांनी टीका केली. आकुर्डी रेल्वे स्थानकालगतची जागा प्राधिकरणाची असून, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होऊ शकते. त्यासाठी या स्थानकालगतची जागा प्राधिकरणाकडून राखीव ठेवली आहे. ही बाब लक्षात न घेता महापालिका आयुक्तांनी उद्यानांचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही केली. शहरवासीयांची ही शुद्ध फसवणूक आहे. (प्रतिनिधी)
>अनेक प्रकल्प राबविताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडलेही आहेत. एमआयडीसीच्या मोकळ्या जागेवरील साई उद्यानातील बांधकाम केले असून, संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस एमआयडीसीने बजावलीही आहे. यासह अनेक अनधिकृत बांधकामे खुद्द महापालिकेनेच केली आहेत.