'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:12 AM2022-03-20T10:12:00+5:302022-03-20T10:16:27+5:30

जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते.

ncp leader rajesh tope meets aimim imtiaz jaleel create havoc in politics | 'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

googlenewsNext

मुंबई: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या ऑफरवरून राज्यात सुरू झालेल्या वादळाचे निमित्त झाले ते खासदार जलील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या भेटीचे. 

जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. तेव्हा एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचा निरोप आपण शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे जलील यांनी टोपेंना सांगितले. जलील यांनी शनिवारी माध्यमांद्वारे ही बाब उघड केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम महाविकास आघाडीसोबत असेल का, या चर्चेलादेखील ऊत आला.

एमआयएमची चर्चा घडवून आणणे हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न फसल्याने त्यांनी आता प्लॅन बी आखलेला दिसतो. या मुद्यावर शिवसेना आक्रमक होईल आणि महाविकास आघाडी तुटेल, हे त्यांचे मनसुबे दिसतात. पण त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही.
- चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे माजी खासदार

एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात ती दिसली. औरंगजेबासमोर गुडघे टेकणारे आमचे मित्र, आदर्श होऊच शकत नाहीत. अशा लोकांशी आमचा कोणताही संबंध येऊ शकत नाही. युती होण्याचा तर प्रश्नच नाही, या अफवा आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील.  - खा. संजय राऊत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते

भाजपला रोखण्यासाठी सगळे एकत्र येताना दिसत आहेत. एमआयएमच्या प्रस्तावावर आता शिवसेना काय भूमिका घेते, ते पाहायचे. तसेही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता ‘जनाब शिवसेना’ झालेली आहे. शिवसेना अजानच्या स्पर्धा घेत आहे. अजून ते कुठपर्यंत जाणार, ते बघू. - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी ज्यांची निष्ठा आहे, तेच आमच्यासोबत येऊ शकतात. भाजपचा राज्यघटनेशी संबंध केवळ शपथ घेण्यापुरताच आहे. एमआयएमचे वागणेही घटनाविरोधी अन् धार्मिक कट्टरवाद पसरविणारे असते. ते आम्हाला मान्य नाही.
- बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते.

Web Title: ncp leader rajesh tope meets aimim imtiaz jaleel create havoc in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.